शिंदेंच्या कॅबिनेट मिटिंगला अनेक मंत्री गैरहजर; भुजबळ ओबीसी मेळाव्यात, इतर मंत्री का आले नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:39 PM2023-11-17T14:39:03+5:302023-11-17T14:39:27+5:30
अजित पवार हे निधी वाटपावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील ते आले नव्हते. तेव्हा डेंग्यू झाल्याचे कारण देण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीला सुरुवात पण झाली आहे. परंतू, अनेक मंत्रीच बैठकीला गैरहजर असल्याने शिंदे सरकारमध्ये सारे काही आलबेल आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक मंत्री मुंबईत आलेले नाहीत, यामुळे ते बैठकीला हजर नसल्याचे सांगितले जात आहे.
डेंग्यू आणि दिवाळी सुट्टीनंतर अजित पवारांनी सकाळी ९ वाजताच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीला देखील राष्ट्रवादीचे मंत्री गैरहजर होते. धनंजय मुंडे आणि वळसे पाटील हे दोघेच आले होते. तर आता दुपारी सुरु झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे सरकारचे १८ मंत्री हजर आहेत. जवळपास ११ मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली आहे.
यापैकी छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या मेळाव्याला जालन्यामध्ये आहेत. यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतू इतर मंत्री का आले नाहीत असा विषय चर्चेला आला आहे. हे मंत्री दिवाळीनिमित्त आपापल्या मतदारसंघांत आहेत, यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे सांगितले जात आहे.
महत्वाचे म्हणजे अजित पवार या बैठकीला आले आहेत. अजित पवार हे निधी वाटपावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील ते आले नव्हते. तेव्हा डेंग्यू झाल्याचे कारण देण्यात आले होते. परंतू, दिवाळीत ते दिल्ली, पुणे, बारामती अशा ठिकाणी ये-जा करत होते. आता अजित पवार पुन्हा सक्रीय राजकारणात अॅक्टीव्ह झाले आहेत.