नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीमधील सेंट्रल मॉल इमारतीमध्ये अतिरेकी घुसल्याच्या चर्चेने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. एनएसजी कमांडोसह, सशस्त्र पोलिसांची पथके मॉलमध्ये आल्याने उपस्थितांची तारांबळ उडाली. मात्र थोड्या वेळात अतिरेकी आले नसून मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला, परंतु या चाचणीच्यावेळी वाहतूक व्यवस्था योग्यपद्धतीने हाताळण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे समोर आले. नवी मुंबईमधील सर्वात मोठी व्यावसायिक इमारत म्हणून सीवूड रेल्वे स्टेशनची ओळख निर्माण झाली आहे. या इमारतीमधील सेंट्रल मॉल, बिगबाजार व इतर दुकाने सुरू झाली आहेत. येथे शहरवासीयांची गर्दी होवू लागली आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी त्याठिकाणी मॉकड्रीलचे आयोजन केले होते. अचानक एनएसजी कमांडोचा गणवेश घातलेले व अत्याधुनिक बंदुका घेतलेले पोलीस मॉलमध्ये शिरले. काही वेळेमध्ये अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व इतर सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी मॉल परिसरामध्ये हजर झाले. सुरक्षा जवानांनी मॉलमधील सर्व दुकानांची तपासणी घेतली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती. मॉलमध्ये अतिरेकी घुसल्याच्या वृत्ताने पूर्ण सीवूड, नेरूळ परिसरामध्ये खळबळ उडाली होती. सोशल मीडियावरून मेसेजही फिरू लागले होते. परंतु काही वेळातच हे मॉकड्रील असल्याचे स्पष्ट झाले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मॉकड्रीलच्या दरम्यान नेरूळ ते सेक्टर ४२ कडे जाणाऱ्या रोडची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहने ये - जा करत होती. वास्तविक वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये केलेल्या बदलाची माहिती वाहनधारकांना तत्काळ मिळेल अशी व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु उड्डाणपुलाच्या बाजूला वाहतूक पोलीसच नसल्याने तिकडून येणाऱ्या वाहनांना समोरील वाहने उलट्या दिशेने का येत आहेत हेच कळत नव्हते. यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली होती.सीवूड हा नवी मुंबईतील वाहतुकीची समस्या नसलेला एकमेव नोड होता. परंतु, रेल्वे स्टेशनच्या जागेवर भव्य वाणिज्य संकुल उभारल्यामुळे या परिसरातही वाहतूककोंडी वाढू लागली आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे परिसराची शांतता भंग पावली आहे. वाणिज्य संकुलामुळे लाभ कमी व त्रास जास्त होत असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करु लागले आहेत. वेळेत वाहतुकीचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दक्ष नागरिकांनी दिला आहे. पार्किंगची स्थिती बिकटसीवूड रेल्वे स्टेशनमध्ये मॉल सुरू झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होवू लागला आहे. मॉलच्या बाहेर रोडवर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात आहेत. भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दहशतवाद्यांच्या चर्चेने सीवूडमध्ये खळबळ
By admin | Published: June 08, 2017 2:54 AM