- सोमनाथ खताळ/पुरुषोत्तम करवाबीड : लिंगबदल करून ललिताचा ललितकुमार झाला. गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या मुलीसोबत तो विवाहाच्या बंधनात अडकला. आता पुढे काय, या समाजमनात निर्माण झालेल्या प्रश्नावर ललितकुमार म्हणाला, ‘चार वर्षे संघर्ष केला. मोठी सत्त्वपरीक्षा होती ती. लिंगबदलाची परीक्षा दिली. पास झालो. लग्नही झाले. आता वेळ आहे सुखी संसाराबरोबरच बाप बनून निकाल देण्याची.’लिंगबदल केलेला ललितकुमार आणि त्याची पत्नी सीमा या दाम्पत्याने ‘लोकमत’ला त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. माजलगाव तालुक्यातील राजेगावचा रहिवासी असलेला ललित साळवे २०१० साली बीड पोलीस दलात महिला म्हणून भरती झाला. त्यावेळी रेकॉर्डला त्याचे नाव ललिता असे होते. २०१५ पासून त्याला स्वत:च्या शरीरात हार्माेन्समध्ये बदल जाणवू लागला. त्यामुळे बाहेरून स्त्री आणि आतून पुरुष ही घुसमट त्याला त्रास देऊ लागली. अखेर २०१७ साली तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे त्याने लिंगबदलासाठी अर्ज केला. परवानगी आणि शस्त्रक्रिया करण्यात तीन वर्षांचा काळ गेला. २०१८ मध्ये एक व २०१९ मध्ये दोन अशा तीन शस्त्रक्रिया करून ललिताचा ललितकुमार झाला. राज्य सरकारनेही त्याला पोलीस दलात पुरुष म्हणून स्वीकारले. सध्या तो पोलीस शिपाई आहे.ललितकुमारची पत्नी सीमा ही मूळची औरंगाबादची. शिक्षण बी.ए. तृतीय वर्ष. ललितची पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हाच त्याचा भाऊ बाळासाहेब यांच्या सासू-सासऱ्यांनी सीमाकडे मागणी घातली; परंतु मुलीबरोबर कसे लग्न करणार, असे म्हणत सीमाने नकार दिला. चार महिन्यांपूर्वी सीमा एका कार्यक्रमासाठी माजलगावला आली. याच कार्यक्रमात सीमाने ललितला पारखून पाहिले. त्यावेळी त्याच्या सर्व शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. खरेतर याच कार्यक्रमात ती ललितच्या प्रेमात पडली. पुन्हा एकदा आईने विचारले तेव्हा सीमाने काहीसा वेळ मागितला.अखेर ‘व्हॅलेंटाईन डे’नंतर तिसºया दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारीला औरंगाबादेत दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही ललितच्या राजेगाव या मूळगावी आले. रात्रीचे १२ वाजलेले होते, तरी ग्रामस्थ या दोघांची वाट पाहत होते. सर्वांनाच कुतूहल होते. दुसºया दिवशी गडंगण, चहा-पाण्यासाठी अनेकांचे बोलावणे येऊ लागले. हा क्षण या नवदाम्पत्याला खूप सुखावणारा होता. गावकऱ्यांनी हे लग्न स्वीकारले, याची पावती देणारा होता.लग्नानंतर माजलगाव धरण परिसरात सैरलग्न होताच ललित व सीमा दाम्पत्याने माजलगाव धरण परिसराची सैर केली. एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविल्यानंतर सीमा माहेरी गेली. आता २३ फेब्रुवारी रोजी राजेगावातच स्वागत समारंभ होणार आहे. सुट्टी मिळाली, तर हनीमून ठरवू, असे ललित म्हणाला.युट्यूब, बातम्या पाहून केला अभ्यासचार महिने युट्यूब, बातम्या, व्हिडीओ आदी माध्यमांतून सीमाने लिंगबदलानंतरचे आयुष्य या विषयावर अभ्यास केला. त्यानंतर, तिने लग्नास होकार दिला. ‘आपला जीवनसाथी निवडण्यासाठी प्रत्येक जण असेच करीत असतो,’ असे सीमा सांगत होती.जीवनात ही घडी...शस्त्रक्रियेनंतर मला चार स्थळे आली, पण कुठे मुलीचे शिक्षण, तर कुठे तिचे दिसणे यामुळे मी ते नाकारले. पहिल्या भेटीतच मला सीमा आवडली. माझे जीवन खरोखरच संघर्षाचे राहिले आहे. आता हा संघर्ष संपला आहे. सीमाच्या रूपाने मला साथीदार मिळाला आहे. सुखाने संसार करून चांगले जीवन जगण्याची इच्छा आहे. - ललितकुमार साळवेचांगली नोकरी आणि दिसायलाही देखणा, यामुळे पहिल्याच भेटीत मी ललित यांच्या प्रेमात पडले. लग्नानंतर समाज काय म्हणेल, याची चिंता मी केली नाही. लग्नानंतर मी खूप खूश आहे.- सीमा साळवे
लिंगबदल केलेल्या ललितच्या लग्नाची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:48 AM