ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवून शोभा डे यांनी मराठीचे चांगले पांग फेडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून टीकास्त्र सोडले असून त्यांनी जी मुक्ताफळे उधळलीत तो मराठीचा अपमान आहे, असे उद्धव यांनी लेखात म्हटले आहे. राज्य मराठी असले तरी राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, कला, संस्कृती यासाठी काही करू नये अशी काही उपटसुंभांची अपेक्षा असते. पुन्हा तसे केले तर त्यास दादागिरी म्हटले जाते. मराठीच्या मुळावर मराठी दांडेच गोतास काळ बनून आले तर काय करायचे? असा प्रश्न लेखात विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे शोभा डे बरोबर आमिर खाननेही असा निर्णय घ्यायची काय गरज होती असे विचारत या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
'काय हे शोभा आण्टी' या मथळ्याखाली सामनातून शोभा डे यांचा समाचार घेण्यात आला असून महाराष्ट्रात जन्मास येऊन मराठीचे पांग आपण चांगलेच फेडत आहात, अशा उपरोधिक शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसेच मराठी असूनही मराठी चित्रपट व लोकप्रिय मरठी खाद्यपदार्थांची टिंगल उडवल्याबद्दलही त्यांना सुनावण्यात आले आहे.
मल्टिप्लेक्स सिनेमागृहांत मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याच्या मुद्द्याबाबत पेज थ्री’वाल्या एक सुसाट मराठी महिला शोभा डे पचकल्या आहेत. मराठी सिनेमांना प्राईम टाईम देणे त्यांना आवडले नाही व त्यांनी सरकारी निर्णयावर टीका केली आहे. प्राइम टाइमला मराठी सक्ती ही दादागिरी आहे व आता चित्रपटगृहांमध्ये पॉपकॉर्नऐवजी वडापाव आणि मिसळ खावी लागेल! अशी मुक्ताफळे या बाईंनी उधळली आहेत. इतर कोणी ही ट्विटरवरची टिवटिव केली असती तर एकवेळ समजण्यासारखे होते. पण शोभा आण्टी या मराठी बाईने ही टिवटिव केली हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे लेखात म्हटले आहे. दादागिरीचा विषय ‘आण्टी’ने काढला म्हणून सांगायचे असे की इतिहास काळात शिवाजी महाराज व आताच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादागिरी केली नसती तर शोभा आण्टीच्या आधीच्या व आताच्या पिढ्या पाकिस्तानात जन्मास आल्या असत्या व बहुधा त्यांना ‘पेज थ्री’च्या पार्ट्या बुरख्यातच साजर्या कराव्या लागल्या असत्या.
मराठीविषयी पोटशूळ उठणा-यांना मराठी ठसका व दणका द्यावाच लागेल. मराठीचे खायचे व गरज सरताच द्वेषाच्या पिचकार्या मारायच्या. शोभा आण्टीने जी मुक्ताफळे उधळलीत तो मराठीचा अपमान आहे, असे लेखात म्हटले आहे.