शेगाव : प्रसुतीसाठी आलेल्या महीलेच्या सिझेरीयन नंतर दोन दिवसांनी सदर महीलेचा आज शनिवारी सकाळी अचानकपणे मृत्यु झाला. सदर मृत्यु हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला असुन पोलीसांनी सध्या डॉक्टर दांम्पत्याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार कांचन संदीप वैराळे वय २२ वर्ष,रा. बोरगाव वैराळे, ता. बाळापूर, जि. अकोला ही महीला पहील्या प्रसुतीसाठी तिच्या माहेरी झाडेगाव, ता. शेगाव येथे आली होती. १0 जुलै रोजी सदर महीलेला शेगाव येथील सईबाईमोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सिझेरीयन करावे लागेल, असा वैद्यकीय सल्ला दिल्याने या महिलेला शेगावातीलच श्री. गजानन हॉस्पीटल व प्रसुतीगृह येथे हलविण्यात आले. त्याच दिवशी डॉ. विनय अग्रवाल व डॉ. सौ. अर्चना अग्रवाल यांनी सिझेरीयन केले. यामध्ये महीलेला मुलगा झाला. मागील दोन दिवस महीलेची तब्येत चांगली असतांना आज शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अचानकपणे महीलेचा मृत्यु झाला. डॉक्टरांनी दुसर्या रुग्णांसाठी सुचविलेले इंजेक्शन येथील नर्सने सदर महिलेला दिले व या नंतर डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला व त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेची माहीती शेगावचे ठाणेदार ड.िड.ि ढाकणे यांना मिळताच त्यांनी दंगा काबु पथकासह घटनास्थळ गाठुन परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी पोलीसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. डॉक्टर दांम्पत्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत होते. नंतर डॉक्टरांना अटक करुन गुन्हे दाखल करा अशी मागणी करत नातेवाईकांनी दुपारी ३ वाजेपर्यंत रुग्णालयातुन प्रेत ताब्यात घेतले नाही, शेवटी डॉक्टर दांम्पत्याला पोलीसांनी अटक करुन विविध कलमान्वये गुन्हे दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृत महीलेची उत्तरीय तपासणी अकोला येथील रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार सदर प्रेत अकोला येथे हलविण्यात आले. या घटनेच्या दरम्यान गोपाल देवलाल ढगे या युवकाच्या हाताला गंभीर इजा झाल्याने त्याला प्रथम सईबाई मोटे रुग्णालय व नंतर अकोला येथे हलविण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असुन पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत. शेगावचे ठाणेदार ड.िड.िढाकणे, पी.एस.आय. कौराती, पाडवी, पोहेकॉ अरुण खुटाफळे यांच्या सह पथकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.
शेगावात रुग्णालयाची तोडफोड
By admin | Published: July 12, 2014 10:11 PM