मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना त्यांना हा पुरस्कार देणे योग्य की अयोग्य या वादाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटणे सुरूच आहे. या वादाला जाती-पातीच्या बरोबरीने पक्षीय राजकारणाचे रंग मिळाल्याने व अनेक साहित्यिकांनीही हिरिरीने या वादात उडी घेतल्याने वातावरण आणखी तापले आहे. पुरंदरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्रात तांडव करीन, हा मनसेचे अघ्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा आणि राष्ट्रवादीने केलेली अभिनव आंदोलनाची घोषणा याने त्यात भर पडली. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणच्या दगडफेकीने या वादाला हिंसाचाराचे गालबोट लागले. त्याचवेळी कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी राजभवनात पुरस्कार सोहळा पार पाडण्याची चोख व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.पुरंदरे यांना बुधवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे व या पुरस्काराला विरोध असलेले अन्य कार्यकर्ते त्यांच्या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज अथवा जिजाऊंच्या पुतळ्यापाशी जाऊन बसतील व ‘आम्ही आपली बदनामी रोखू शकलो नाही’ याबद्दल माफी मागतील, असे अभिनव आंदोलन राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी जाहीर केले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन द्वेषाला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार सोहळा रद्द करण्याची मागणीही आव्हाड यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि भाजपामधील काही मंत्री यांनी मिळून महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून फडणवीसांविरुद्ध हे कुभांड रचले आहे, असा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज म्हणाले की महाराष्ट्राची सत्ता गेल्याने पवार अस्वस्थ असून, ती पुन्हा मिळवण्याकरिता जातीपातीचे गलिच्छ राजकारण खेळत आहेत. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने जाणीवपूर्वक महाराष्ट्र भूषण पुरस्काराकरिता ब्राह्मण व्यक्तीची निवड केली गेली आणि पवार व भाजपाचे काही मंत्री यांनी हा वाद निर्माण केला. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लेखन केले असल्याचे जर पवार यांचे मत असेल, तर यापूर्वी ३ ते ४ वेळा पवार यांनी पुरंदरे यांचा सत्कार का केला? पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरंदरे यांना पुरस्कार द्यायला विरोध आहे, तर पवारांच्या कन्येने बाबासाहेबांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे पत्र का लिहिले, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांचा समाचार घेताना राज म्हणाले की, यांची ही असली विद्वत्ता काय कामाची. नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हाही विरोध झाला होता. मग त्यांनी कशाला ज्ञानपीठ स्वीकारला? ज्ञानपीठ विजेत्याचे वर्तन कसे असायला हवे, याचे धडे नेमाडे यांनी कुसुमाग्रज, करंदीकर यांच्याकडून घ्यायला हवेत.हायकोर्टात आज याचिकेवर सुनावणीपुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर बुधवारी ११ वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुणे येथील पद्माकर जनार्दन कांबळे व राहुल सदाशिव पोकळे यांनी अॅड़ शेखर जगताप यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे़ या पुरस्कारास पुरंदरे पात्र नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यांना दिलेला हा पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याविरोधात संभाजी बिगे्रडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राज्यात हिंसक आंदोलन केले. पंढरपूरमध्ये एस.टी. जाळली. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या नगरच्या संपर्क कार्यालयात दुपारी निवेदन देण्यासाठी गेलेले बिग्रेडचे कार्यकर्ते कार्यालयावर दगडफेक करून पळून गेले. तेथे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांच्या लेटरहेडवरील निवेदनाच्या प्रती कार्यकर्त्यांनी फेकल्या. त्याखेरीज नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे तर मनसेने शरद पवारांविरोधात आंदोलन केले. नांदेडमध्ये अज्ञात तरुणांनी दोन बसेसवर दगडफेक केली. उमरी-नांदेड रस्त्यावर पत्रके वाटण्यात आली. राज ठाकरे काय बोलतात त्याला मी महत्त्व देत नाही. आजही अनेक लोकांना प्रसिद्धी मिळविण्याकरिता माझ्या नावाचा वापर करावा लागतो. पुरंदरे यांच्याबद्दल जो वाद सुरू आहे त्यावर पडदा पडावा, असे वाटते.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसराजकीय हितासाठी कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर भाजपा त्याला शिंगावर घेतल्याखेरीज गप्प बसणार नाही. शरद पवार व राज ठाकरे हे प्रतिक्रियावादी राजकारण करीत असून भाजपा विकासाकरिता काम करीत आहे.- आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजपाराज ठाकरे यांच्यावर मायकेल जॅक्सनचे संस्कार असल्याने ते तांडव करण्याखेरीज अन्य काही करु शकत नाहीत. मात्र नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांची हत्या झाली तेव्हा राज यांना महाराष्ट्रात तांडव करावेसे का वाटले नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे हे साहित्य क्षेत्रातील दहशतवादी होऊ पाहत आहेत. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्यावर नेमाडे यांनी आपल्याशी चर्चा करावी हे आपले जाहीर आव्हान आहे. कर्त्या माणसाने महाराष्ट्र भूषणवरील वाद मिटवायला हवा होता. मात्र ते भडकवत आहेत.- विश्वास पाटील, लेखकपुरस्कार सोहळा दादर येथील शिवाजी पार्क वा पुण्यातील शनिवार वाडा येथे आयोजित करायला हवा होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयातील मौन सोडायला हवे.- संजय राऊत, खासदार शिवसेनाभाजपा व राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा राज ठाकरेंनी केलेला आरोप चुकीचा आहे. ‘कोट्या’ करायची ठाकरे कुटुंबाला सवयच आहे.- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपापुरंदरे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला एका विशिष्ट कामगिरीसाठी राज्य सरकारने पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन.- विनायकराव पाटील, माजी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री
वादाचा फड शिगेला!
By admin | Published: August 19, 2015 2:00 AM