पुणे, दि. 7 - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यातील वादाच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण वाद संपुष्टात आल्यानंतर या दोघांमधील अनोखा दोस्ताना सर्वांसमोर आला आहे. आमीर खानच्या विनंतीला मान देत शाहरुख खाननं पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये उपस्थिती लावून आमीरला ''फ्रेंडशीप-डे'' चं अनोखं गिफ्ट दिले.
आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात हे दोघंही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी त्याने आपल्या अनुपस्थिती बाबत सांगताना किरण रावसह आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली. तीव्र इच्छा असतानाही कार्यक्रमाला हजर राहता न आल्यानं आमीरनं यावेळी खंतही व्यक्त केली.
आपण न गेल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होऊ नये यासाठी आमीरनं शाहरुख खानला कार्यक्रमात उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती केली. आमिरचा शब्द पडू न देता शाहरुखही लगेचच होकार दर्शवला व तो पुण्यात कार्यक्रमात सहभागीही झाला.
या कार्यक्रमात संवाद साधताना शाहरुख म्हणाला की, 'आमीर आजारी आहे. मी दिल्लीमध्ये चित्रपटाचे शुटिंग करत होतो. किरकोळ जखमी झाल्याने मी मुंबईकडे परतत होतो. तेव्हा आमिरचा फोन आला. त्याने सांगितले तू पुण्याला जा. त्याच्या सूचनेप्रमाणे मी कार्यक्रमाला हजर झालो आहे. त्याने दुष्काळमुक्तीसाठी काम सुरू केल्याचे सांगितले होते. परंतु हे काम एवढे मोठे आहे याची कल्पना नव्हती.'
विशेष म्हणजे रविवारी फ्रेंडशीप-डे होता. शाहरुखने आपल्या मित्राची विनंती मान्य करून कार्यक्रमाला जवळपास 6 तास उपस्थिती लावून प्रोफेशनेलिझममध्येही मैत्रीचे बंध जपता येतात हे दाखवून दिले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोकही उपस्थित होते.