लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना देत असताना सन २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले.भाजपातर्फे १ जूनपासून विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा अचानक नागपूर दौरा ठरला.नागपुरात येताच शाह यांनी अगोदर नागपुरातील आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. २०१९ च्या निवडणुकांसोबतच २०२४ च्या टप्प्याकडे लक्ष देऊन पक्षबांधणीला लागा, अशी सूचना केली. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ते संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ.भागवत तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट घेतली. तिघांमध्येही सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. शहा अडीच तास मुख्यालयात होते व सायंकाळी ७.४० वाजता ते तेथून रवाना झाले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले. शाह यांनीदेखील बोलण्यास नकार दिला. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमकुवत जनाधार असलेल्या प्रदेशावर जास्त लक्ष केंद्रित करावे.सरसंघचालक, शाह एकाच विमानातअमित शाह दुपारी १२.१५ वाजता विमानाने नागपुरात दाखल झाले. विशेष म्हणजे सरसंघचालकदेखील त्याच विमानातून नागपुरात आले. मात्र बाहेर निघताना दोघेही एकत्र न येता वेगवेगळे बाहेर आले. सरसंघचालक संघ मुख्यालयाकडे रवाना झाले तर शाह यांच्या गाड्यांचा ताफा रविभवन शासकीय अतिथीगृहाकडे वळला.
शाह -सरसंघचालकांची बंदद्वार चर्चा
By admin | Published: May 30, 2017 3:40 AM