दोन भावंडांचे हत्याकांड : जिल्हा न्यायालयाचा निकालसिवान : सिवान जिल्ह्यात ११ वर्षांपूर्वी अॅसिड हल्ल्यात दोन भावांच्या निर्घृण हत्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन आणि इतर तिघांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजयकुमार श्रीवास्तव यांनी २००४ च्या या हत्याकांडात शहाबुद्दीन आणि त्यांचे तीन सहकारी राजकुमार शाह, शेख असलम आणि आरिफ हुसेन यांना बुधवारी भादंविच्या ३०२ (हत्या), ३६४ ए (खंडणीसाठी अपहरण), २०१ (गुन्ह्याशी संबंधित पुरावे लपविणे अथवा चुकीची माहिती देणे) आणि १२० (गुन्हेगारी कट) कलमान्वये दोषी ठरविले होते. न्यायालयाने शहाबुद्दीन यांना २०,००० रुपयांचा दंडही दिला आहे. फिर्यादी पक्षाच्या सांगण्यानुसार १६ आॅगस्ट २००४ रोजी आरोपी राजकुमार शाह, शेख असलम आणि आरिफ हुसेन यांनी चंद्रशेखर प्रसाद यांच्या तीन मुलांचे गोशाला मार्गावरील घरातून अपहरण करून त्यांना प्रतापपूरला नेले. तेथे गिरीश आणि सतीश यांच्यावर अॅसिड फेकण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रसाद यांचा एक मुलगा राजीव रोशन तेथून पळून गेला होता, त्यामुळे वाचला. दोन्ही भावंडांचे मृतदेह सापडले नव्हते. त्यानंतर मृतांची आई कलावतीदेवी यांनी आपल्या मुलांच्या हत्येसाठी शहाबुद्दीन यांच्या तीन सहकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. राजीव रोशन या प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. परंतु गेल्या वर्षी १६ जूनला अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली होती. (वृत्तसंस्था)
शहाबुद्दीन यांना जन्मठेप
By admin | Published: December 12, 2015 2:47 AM