Shahajibapu Patil On Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच या योजनेचा तिसरा हप्ता देण्यासही सुरुवात झाली आहे. यातच गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळाले असते का, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
सांगलीतील एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की, शिंदेंसोबतच्या आमदारांना ५० खोके मिळाले. आम्हीपण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला ५० खोके मिळाले नाहीत. उठ सुट ५० खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत. पण पन्नास खोक्यांचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही, या शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी हल्लाबोल केला.
गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?
आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळाले असते का, शेतकऱ्यांना वीजबील माफ झाले असते का, असे सांगत संजय राऊतांना मतदान करण्याची आमची इच्छा नव्हती. आम्हाला संजय राऊत नाही, शिवसेना महत्त्वाची होती. त्यामुळे सर्वांनी गुपचूप मतदान करावे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मविआने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
दरम्यान, 'एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके', मविआमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.