Maharashtra Politics: आगामी महापालिका निवडणुका आणि अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी दोन राऊतांवर माझा खूप राग आहे. या दोन राऊतांनी आमचे वाटोळे केले, असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
शहाजीबापू पाटील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना शहाजीबापू पाटील हजेरी लावत आहेत. यातच भाजपचे नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राऊतांचा निवडणुकीतील पराभव अटळ आहे
लोकसभेच्या निवडणुकीला कोकणात येऊन धुरळा पाडणार. निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हणालात तरी मी येणार. संजय राऊत निवडणुकीला उभे राहत नाही नाहीतर तिथे पण गेलो असतो. राऊतांचा निवडणुकीतील पराभव अटळ आहे, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत बोलताना, ढाल-तलवार ऐतिहासिक परंपरा असलेल्या चिन्हावर शीख समाजाने दावा करणे चुकीचे आहे. ढाल-तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.आमचे हिंदवी स्वराज्य मावळ्यांनी उभे केले. ते ढाल-तलवार हातात घेऊनच उभे केले आहे. आज शिखांनी आक्षेप घेतला. उद्या राजस्थानमधील राजपूत म्हणतील, नंतर कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, हे आमचे चिन्ह आहे आणि आमचेच राहणार, असे शहाजीबापू पाटलांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही केलेला नवा प्रयोग जनतेला आहे. सन १९९५ मध्ये तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी सध्या मला महाराष्ट्र भर फिरताना मिळत आहे. ही सर्व देवाची देणगी असून कोकणातील डोंगर ही लय भारी असल्याचे आमदार शाहाजी पाटील म्हणालेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"