राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. यानंतर आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी "मातोश्रीच्या अंगणात सुख भरभरून द्यावं, रश्मी वहिनी आनंदी राहाव्यात" अशी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे.
"आज गणरायाचं आगमन झालं, दोन दिवसांत चांगला पाऊस द्यावा. मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती, आनंद भरभरून द्यावा. आमच्या रश्मी वहिनी या आनंदी राहाव्यात अशीच मी गणरायाची चरणी प्रार्थना करतो" असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर देखील जोरदार पलटवार केला. "अमोल मिटकरी हे विचार करण्यासारखं राजकारणातलं पात्र नाही. हे सोंगाड्या आहेत. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे मिटकरीला वाटतंय, त्यांची जागा आपल्याला मिळेल म्हणून नटूनथटून तेल लावून टिव्हीपुढे येतंय" असा टोलाही लगावला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं"
शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी जोरदार निशाणा साधला होता. "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत, तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करा" असं म्हणत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच "तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं होतं.
"महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती"
"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचं काय होणार याची चिंता सामना पेपरने करू नये. तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती आहे. जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करतं आहे. दोन्ही नेते चांगले अनुभवी आहेत. जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे" असं पाटील यांनी म्हटलं होतं.