सोलापूर-
संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राठोड यांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय केला असल्याचं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.
"राजकारणात अनेकवेळा नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत असतात. संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते त्याप्रकरणात पोलिसांना त्यांना क्लिनचीट दिली आहे. एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लीनचीट दिली असेल तर त्याचं राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही. एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाबत जो निर्णय घेतला तो न्याय देणारा आहे", असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
खरी शिवसेना आमचीचशिंदे गट आणि शिवसेना असा वाद न्यायालयात सुरू असताना शहाजीबापू पाटील यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्हं देखील आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. राज्यघटनेप्रमाणे ज्या बाजूला बहुमत असतं त्या गटालाच चिन्ह मिळतं. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळेल. सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागतील, असं शहाजीबापू म्हणाले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासारखे कष्टाळू मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेलाच म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला मिळेल असं शहाजीबापू यांनी म्हटलं आहे.