ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - वानखेडे स्टेडियमवर शाही थाटात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात करत देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि हजारोंचा जनसमुदायाने 'याचि देही याचि डोळा' हा शपथविधी सोहळा अनुभवला.
सर्वाधिक जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात भाजपाने सरकार स्थापन केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी वानखेडे स्टेडियम हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण आडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
अशी आहे टीम देवेंद्र
कॅबिनेट मंत्री
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार,विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा
राज्यमंत्री
दिलीप कांबळे, विद्या ठाकूर