मुंबई : कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी,असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. याबाबत मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ यावेळी राज्य सरकारने १८ सप्टेंबरला झालेल्या शाही स्नानासाठी एक टीएमसी पाणी वापरण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी राज्य सरकार पाणी सोडत आहे, त्याला निर्बंध घालावा, अशी याचिका पुण्यातील प्रा. एच.एम. देसर्डा यांनी दाखल केली होती. त्यावर १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला पाण्याच्या योग्य वापराबाबत निर्देश देतानाच याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळत १८ सप्टेंबरच्या शाही स्नानाबाबत अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारने पाण्याच्या वापराबाबतच्या धोरण, त्याचा प्राधान्यक्रम काय आहे, अशी विचारणा केली. प्रथम पिण्यासाठी पाणीपुरवठा करायला हवा, शाही स्नानासाठीचा वापर अखेरचा असला पाहिजे, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ हा धार्मिक व राष्ट्रीय सोहळा असल्याने भक्तांच्या भावनांचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता अभिनंदन वंग्यानी यांनी १८ सप्टेंबर रोजी एक टीएमसी पाणी वापरण्यात आले होते, आणि २५ सप्टेंबरच्या सोहळ्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगितले.
शाहीस्नानासाठी नदी, तलावाचा वापर नको
By admin | Published: September 22, 2015 1:29 AM