विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे १६ ते १८ जून दरम्यान तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या काळात ते तब्बल १८ बैठकी घेणार आहेत. राज्यातील भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्याचा लेखाजोखाही ते घेणार असल्याने या दौऱ्याबाबत भाजपाच्या नेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागात झालेल्या कामांची जंत्री तयार केली आहे. आमदारांनीही त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांची यादी तयार ठेवली आहे. अमित शहा कोणाला केव्हा काय विचारतील याचा नेम नाही. त्यामुळे कोणीही बेसावध राहू नका, असे पक्षाचे नेते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांशीदेखील शहा हे संवाद साधणार आहेत. आमदार, खासदारांप्रमाणे त्यांचेही रिपोर्टकार्ड शहा घेणार आहेत. पक्षाचे १९ विभाग आणि १० प्रकल्प प्रमुख, विविध आघाड्यांचे प्रमुख यांना ते मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ संपादक, मराठी नाटक/सिने कलावंत, प्रबुद्ध नागरिकांशी शहा चर्चा करतील. पं.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त भाजपाचे १५ हजार विस्तारक ९० हजार बुथमध्ये संपर्क करणार असून या उपक्रमाचा आढावाही शहा घेतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेत दिली. अमित शहा जाणार ‘मातोश्री’वरराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मित्रपक्ष शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अमित शहा या दौऱ्यात करणार आहेत. ते रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाचे दर्शन शुक्रवारी घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांविरुद्ध सातत्याने टीका करीत असताना शहा हे कटूता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.