लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बंगलोर येथील जनरल के. एस. थिम्मय्या मेमोरियल ट्रस्टचा अखिल भारतीय पातळीवरील प्रतिष्ठेचा गणला गेलेला ‘जनरल थिम्मय्या पुरस्कार’ कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार शाहू छत्रपती यांना जाहीर झाला. आदर्शभूत समाजसेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार शाहू छत्रपतींना शनिवारी (दि. १६) बंगलोर येथे समारंभपूर्वक बहाल केला जाणार आहे.
जनरल थिम्मय्या हे सन १९५७ ते १९६१ या काळात भारताचे सरसेनापती होते. दुसºया महायुद्धात त्यांनी एक लढाऊ सेनानी म्हणून ख्याती प्राप्त केली होती. विशेष म्हणजे बंगलोरच्या ‘बिशप कॉटन बाईज स्कूल’ या १५० वर्षे जुन्या नामवंत शिक्षण संस्थेचे ते विद्यार्थी होते. याच संस्थेतून व्हिक्टोरिया क्र ॉस सन्मानित विल्यम रॉबिनसन, गे्रट ब्रिटनचे सरसेनापती सर फॅ्रक सिम्पसन, अॅडमिरल विजय शेखावत, जगप्रसिद्ध भारतीय अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती तेथे शिकल्या. शाहू महाराज यांचे शिक्षणही याच शिक्षण संस्थेत पूर्ण झाले.
बिशप कॉटन बाईज स्कूल या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी ‘जनरल थिम्मय्या मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रांत अखिल भारतीय पातळीवर आदर्शभूत कार्य करणाºया व्यक्तीस जनरल थिम्मय्यांच्या नावे पदक दिले जाते. आतापर्यंत जनरल कपूर, अॅडमिरल वडगावकर, अॅडमिरल नायर, राजदूत खलिली आदींना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर्षीचा पुरस्कार शाहू छत्रपतींना जाहीर झाला आहे.
महाराष्टÑातील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिवाजी मराठा एज्युकेशन सोसायटी (पुणे) व छत्रपती शाहू विद्यालय (कोल्हापूर) आदी अनेक शैक्षणिक संस्थांचे शाहू छत्रपती अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक आहेत. मुलींना सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ‘तारा कमांडो फोर्स’ हे केंद्र सुरू केले आहे. देशाच्या सीमांवर तैनात असणाºया मराठा बटालियनच्या भेटीस वारंवार जाऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. सेवानिवृत्त जवान व विधवा पत्नी यांच्या कल्याण योजनांतही ते सक्रिय असतात. कुस्ती, फुटबॉल आदी क्रीडा प्रकारातील खेळाडूंना त्यांचे नेहमी प्रोत्साहन मिळत आले आहे.