मुंबई - घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील १ लाख ३२ हजार ३६० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, सुमारे एक लाख नागरीक अजूनही अडकून पडले आहेत. पुरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी विविध संस्था, बचाव पथके अथक प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा जयंत पाटील यांनीही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून शैलेजा पाटील पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी जेवनाची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी त्यांनी खुद्द स्वयंपाकगृहाची सुत्रे हाती घेतली आहेत. वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त महामार्गावर ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ट्रकमध्ये शेकडो लोक अडकून पडले आहेत. त्यांना जेवन पोहचविण्यासाठी इस्लामपूरमध्ये अनेक घरात मोठ्या प्रमाणात स्वयंपाक तयार करण्याचे काम सुरू आहे. शैलजा पाटील यांनी नियोजन केल्यामुळे दिवसभरात वाळवा तालुक्यातील पुरग्रस्थ गावात ५३०० लोकांचे जेवणाचे पाकीट बनवून पाठविण्यात आले. तसेच वाघवाडी ते मालखेड या पुणे-बंगळुरू हायवेवर चक्काजाम झालेल्या ८०० वाहनधारकांना जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विविध पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. भाजपची महाजनादेश, शिवसेनेची जनआशीर्वाद तर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहेत. यावरून राजकीय पक्षांवर टीका होत आहे. परंतु, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा खोऱ्यातील धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या घाटभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे बेंगळुरु महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील किणी आणि शिरोली गावाजवळ रस्त्यावर चार ते साडेचार फूट पाणी आहे. तर, बेळगावीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.