- अतुल कुलकर्णी मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलनाचा देशात पहिला कायदा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात सहाव्या मजल्यावरच्या दालनाने व आरोग्य मंत्रिपदाने शकुनाच्या गोष्टी सांगणे सुरू केले आहे. ज्या विधानभवनात कायदे केले जातात तेथे पहिल्या मजल्यावर एका सचिवांनी दोन-अडीच डझन देवांच्या तसबिरी ठेवल्या. या पार्श्वभूमीवर अपशकुनी ठरलेल्या ६०२ नंबरच्या दालनाऐवजी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन मिळेल.तशा सूचना मंगळवारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, कुंटे यांना काही काळासाठी दुसरे दालन दिले जाईल. ही व्यवस्था अंमलात येईपर्यंत अजित पवार यांना पहिल्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्यामध्ये मुख्य सचिव बसतील. त्यामुळे गतीने कामकाज होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तसे दालन फक्त अतिरिक्त मुख्य सचिवांचेच आहे जे त्यांना दिले जाईल.सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाचे दालन मंत्रिमंडळातील नंबर दोनच्या मंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना देतात. २१ जुलै २०१२ रोजी मंत्रालयात आग लागली. नूतनीकरणानंतर ते दालन उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना दिले. मात्र सिंचनाच्या टक्केवारीवरून त्यांच्यावर आरोप झाले व पुढे आघाडीचे सरकारही गेले. २०१४ साली भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर हेच दालन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दिले. त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. नंतर हे दालन चंद्रकांत पाटील यांना देण्याचा प्रस्ताव झाला, पण त्यांनी तो नाकारला. पुढे कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांना ते मिळाले. त्यांचे अकाली निधन झाले. नंतर या दालनाची विभागणी करून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना ते दिले. दोघेही २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. सार्वजनिक आरोग्य विभागही शकुन-अपशकुनात मागे नाही. भाई सावंत, बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, दौलतराव अहिर, जयप्रकाश मुंदडा, दिग्विजय खानविलकर, विजयकुमार गावित, विमल मुंदडा, राजेंद्र शिंगणे, सुरेश शेट्टी, डॉ. दीपक सावंत यांनी याआधी हा विभाग सांभाळला. मात्र प्रत्येकासाठी आरोग्यमंत्री पद शेवटचे ठरले. त्यानंतर ते निवडणुकीत हरले. राजेंद्र शिंगणे कसेबसे यावेळी निवडून आले. आता त्यांनाच पुन्हा हे खाते घ्यावे, असा आग्रह सुरू आहे. हे खातेदेखील लाभदायक नाही, अशी आख्यायिका आहे.दोन डझनपेक्षा जास्त देवदेवतांच्या तसबिरीज्या विधिमंडळाने देशात पहिला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे राज्य अशी ओळख महाराष्टÑाला दिली, त्याच विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सचिव मा. मू. काज यांनी एका दालनात दोन डझनपेक्षा जास्त देवदेवतांच्या तसबिरी आणून ठेवल्या आहेत. त्यावर सभापतींना नाराजी व्यक्त करूनही ते देव तेथेच आहेत. नव्या वर्षात हा शकुनाचा खेळ किती व कसा रंगणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
...म्हणून अजित पवार '६०२' ऐवजी सीताराम कुंटेंच्या दालनात बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:26 AM