मुंबई - आधी मुलाला खासदार केल्यानंतर स्वत: भाजपमध्ये जावून मंत्रीपद मिळविणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील देखील याच प्रयत्नात आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे देखील विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
विखे पाटील कुटुंब आणि थोरात यांच्यातील मतभेद सर्वांनाच ठावूक आहे. याचीच परिणीती म्हणून विखे कुटुंबीयांनी थोरातांची नाकेबंदी करण्यासाठी योजना आखली आहे. त्यानुसार सुजय विखे यांनी संगमनेर मतदार संघातून थोरात यांच्याविरुद्ध लढण्यासाठी निवृत्ती महाराजांना गळ घातली होती. परंतु, निवृत्ती महाराजांनी थोरातांविरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपच्या योजनेवर पाणी फिरले.
संगमनेरमधून थोरात यांना आव्हान देणारा उमेदवारही भाजपला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे थोरात यांना आव्हान देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई पाटील यांनाच विधानसभेला संगमनेरमधून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. दुसरीकडे आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असली तरी येथून राष्ट्रवादी तर्फे आबासाहेब थोरात इच्छूक आहेत. मात्र आघाडी होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे भाजपची लढत ही बाळासाहेब थोरात यांच्याशी होणार आहे.
दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. एकूणच उभय नेत्यांनी एकमेकांच्या विजयात अडसर निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र अहमदनगरमध्ये दिसत आहे.