अहमदनगर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांवर ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. यावर शिवसेना नेते(शिंदे गट) आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'हिंदूत्वापासून शिवसेना...'शंभूराज देसाई आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना गद्दार म्हटले जाते, पण आम्ही कोणीही शिवसेना (Shivsena) सोडलेली नाही. ज्वलंत हिंदूत्वाच्या विचारा पासून शिवसेना बाजूला जात आहे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारपासून फारकत घेतली,' असं देसाई म्हणाले.
देसाई पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे नुकसान झाले. शिवसैनिकांचे नुकसान झाले, ते थांबण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी आम्ही ही भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता येणार नाही,' असंही देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केले. 'शिंदे गटाने घेतलेली भूमिका ही सर्व सामान्य जनतेने स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातील जनता कोणा बरोबर आहे हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल,' असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर निशाणासत्ता स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकवेळा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करत असतात. त्यावर बोलताना देसाई म्हणाले की, 'मुख्यमंत्री दिल्लीत जातात ते राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन जातात. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला गेले तेंव्हा राज्याच्या प्रलंबित निधीबाबत त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली. तुम्ही जेंव्हा मुख्यमंत्री होतात, तेंव्हा मंत्रालयात येत नव्हता,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.