Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कर्नाटकाने महाराष्ट्रातील मंत्र्यांना राज्यात येण्यास मनाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर हे तीनही मंत्री सीमाभागात जाणार आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयाने आणि सनदशीर मार्गाने सोडवण्याचे निश्चित झाले आहे. न्यायिक प्रक्रिया व चर्चेद्वारे सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
मराठीजनांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मी, चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करू. सीमाभागातील मराठीजनांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेत आहे. सीमाभागातील बंधू-भगिनींशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर उच्चाधिकार समितीचे समन्वयक मंत्री म्हणून मी आणि चंद्रकांतदादा पाटील जाणार आहोत, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही राज्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी वाढल्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"