मुंबई : राज्यभरात आज मराठी भाषा दिवस साजरा केला जात आहे. मनसेमध्ये राज ठाकरे यांनी ताजा हुंकार फुंकल्याने स्वाक्षरी मोहिमेचा रंगच बदलला आहे. यामुळे ठिकठिकाणी भगव्या बॅनरखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याच दिवशी मराठी जणांना राज ठाकरे यांनी खास शैलीत आठवण करून देत एका काश्मिरी मुस्लीम तरुणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ''राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो'', अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. यानंतर काही तासांनी हा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला. संत ज्ञानेश्वर यांच्या रचना पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि गानकोकिळा लतादीदी यांनी कळसास नेल्या. त्यातील एक रचना 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा' काश्मीरी गायिका शमिमा अख्तर हीने गायली आहे. महत्वाचे म्हणजे याच तरुणीने पसायदानही म्हटले होते. पसायदानाचा हा व्हिडीओ पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला होता.
आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शमिमा अख्तरच्या आवाजातील 'रुणुझुणु' हे गीत सोशल मिडीयावर गुंजू लागले. यास राज ठाकरे यांनीही त्यांच्या खास शैलीत दाद दिली. तसेच समस्त मराठी बांधवांना त्यांनी आठवणही करून दिली. संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या. त्यातील एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संगीत संयोजक मजहर सिद्दीकी यांनी काश्मीरची ओळख असलेल्या रबाब आणि मटका या वाद्यांचा चपखल उपयोग करत मराठी संगीताशी अद्भूत मेळ घातला आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरच्या तत्वज्ञान आणि संगीताचा संगम या सरहद निर्मित गीतात अनुभवायला मिळतो.