शिर्डी : शनिशिंगणापूर येथे दर्शनाची परवानगी मागितली असती तर कदाचित मिळाली नसती म्हणून तरुणीने चौथऱ्यावर जावून दर्शन घेतले असावे. शनीदेवाला महिला व पुरुष समान असल्याचे मत अभिनेत्री व भाजपा खा. हेमामालिनी यांनी येथे व्यक्त केले़देवदर्शनाबाबतच्या भेदभावावर बोलताना त्यांनी हे बदल मानवनिर्मित असून त्यात काळानुरुप बदल व्हावा़ मात्र परंपराही सांभाळायला हव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत साईनगरीतच प्रेम फुलले, अशी कबुलीही ‘ड्रीम गर्ल’ने दिली. प्रतिज्ञा चित्रपटाच्या शुटींगसाठी नाशिकला आल्यानंतर मी धर्मेंद्र यांच्यासोबत शिर्डीला आले होते़ त्यानंतर आमचे प्रेम अधिक फुलले, असे त्यांनी सांगितले. पुरस्कारवापसीबद्दल त्या म्हणाल्या की, पुरस्कार हे देशातील जनतेने दिलेले असतात़ एखाद्याविषयी नाराजी असेल तर बोलले पाहिजे़ पुरस्कार परत करणे हा देशाचा अवमान आहे़ असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करणे, हे राजकारणाने प्रेरीत असल्याचे त्यांनी सांगितले. हेमामालिनी यांनी शुक्रवारी जावई वैभव वोहरा व पाच महिन्यांचा नातू डेरीन यांच्यासह साईदरबारी हजेरी लावली़ साईसमाधीवर शाल चढवून त्यांनी पाद्यपूजा केली़ स्वच्छतेचा प्रश्न शिर्डीतच नाही तर अवघ्या देशात आहे़ त्यासाठी प्रत्येकाने मानसिकता बदलवावी, असेही त्यांनी सांगितले.
शनिदेवाला महिला, पुरुष समानच - हेमामालिनी
By admin | Published: December 05, 2015 9:07 AM