नवी दिल्ली : शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा वाद शिगेला पोहोचला असताना द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, शनी हा मुळात देव नव्हे तर तो केवळ एक ग्रह आहे, असे म्हणून या वादात तेल ओतले आहे.शनी हा देव नसून तो एक ग्रह आहे. तेव्हा त्याची पूजा करण्याऐवजी त्याला पळवून लावले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.महिलांनी शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशासाठी संघर्ष करण्याची काहीच गरज नाही. कारण पूजा ही देवाची केली जात असते, ग्रहाची नाही आणि शनी हा एक ग्रह आहे. त्यामुळे महिलांनी शनी पूजनापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, असे स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले. शनी शिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी आहे. ही बंदी उठविण्यात यावी यासाठी पुण्याच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेड या महिला संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शंकराचार्यांच्या मते, या देशातील महिलांना यापूर्वीच सर्व सामाजिक अधिकार मिळाले आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष अशी सर्व मोठी पदे त्यांनी भूषविले आहेत. परंतु धर्म मान्यता आणि परंपरांवर चालत असतो. तेथे सामाजिक अधिकारांना स्थान नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)वादग्रस्तपणाची सवयशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी यापूर्वी साईबाबांना देव मानण्यास आणि त्यांची पूजा करण्यास विरोध केला होता. एवढेच नाही तर धर्मसंसद बोलावून यासंदर्भात घोषणाही केली होती.
शनी हा देव नव्हेच, तो तर आहे ग्रह!
By admin | Published: January 29, 2016 4:16 AM