अहमदनगर/पुणे : शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा, असे सांगत शनैश्वर देवस्थानने आपल्या पुढ्यातील चेंडू सरकार दरबारी टोलविला. त्यामुळे कालपर्यंत जिल्हा प्रशासन आणि देवस्थानच्या माध्यमातून ही ‘पिडा’ परस्पर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारला सर्वमान्य तोडग्यासाठी बरेच तेल गाळावे लागणार असे दिसते.शनी चौथरा चढण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या शेकडो महिलांनी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, प्रजासत्ताकदिनी शनी शिंगणापूरकडे कूच केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवर सुपा येथेच रोखले. शिंगणापूरकडे जाऊ न देता या आंदोलकांना सायंकाळी पुन्हा पुणे हद्दीत पाठविण्यात आले. या आंदोलनाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मागविला आहे़ शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीमुळे उपस्थित झालेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी ‘स्त्री-पुरुष भेदभाव करू नये, वाद मिटविण्यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थानने पुढाकार घ्यावा,’ असा सल्ला देवस्थानला दिला होता. त्यावर देवस्थानने आपली भूमिका बुधवारी माध्यमांसमोर मांडली़ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे़ ती खंडित करणे एवढ्या सहजासहजी शक्य नाही़ यासंदर्भात सरकार, प्रशासन, धर्मगुरु आणि देवस्थानच्या विश्वस्तांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करावी़ सर्वांगीण चर्चा करून यावर सन्माननीय तोडगा काढावा, तो आम्हाला मान्य राहिल़ पण, अशा पध्दतीने कुणी रुढी आणि परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याविरोधात गावकरी एकजुटीने रस्त्यावर उतरतील, असा इशारा देवस्थानच्या वतीने विश्वस्त योगेश बानकर यांनी दिला़आखाडा परिषदही उतरलीशनी दर्शनावरून उद्भवलेल्या या वादात आता अखिल भारतीय आखाडा परिषदही उतरली आहे. कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असू नये. मंदिरांमध्ये महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिली पाहिजे, अशी भूमिका आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी मांडली आहे. रविशंकर यांचेही समर्थन... शनी चौथऱ्यावर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पाठिंबा दिला आहे. महिलांनी दर्शन घेऊ नये, असे हिंदू शास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. उलट महिलांनी पूजाअर्चा केल्यास देवाला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले.भूमाता ब्रिगेडचा दावामहिलांना शनिशिंगणापूर येथील शनीचे दर्शन घेता यावे यासाठी भूमाता रणरागिणी ब्रिगेडने घेतलेल्या भूमिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता तृप्ती देसाई यांनी गर्दीतच फडणवीस यांना शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना जाण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन दिले.
शनीचा तिढा, सरकारी पिडा
By admin | Published: January 28, 2016 3:49 AM