मुंबई : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही. तसेच, उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवायचे आहे, असे विधान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे.
सोमवारी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे स्वागत केले व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या पादुकांचे पूजनही केल्याचे सांगण्यात येत आहे.
या भेटीनंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वात मोठा घात गौ घात सांगितला गेलाआहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
विश्वासघात सहन करणारा हिंदू असू शकतो. कारण त्याच्यासोबत विश्वासघात झाला आहे. ज्या लोकांनी विश्वासघात केला आहे, ते कसे हिंदू असतील? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघातामुळे आमचेही मन दु:खी झाले आहे. लोकांच्या मनात ते दु:ख आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसत नाहीत, तोपर्यंत हे दु:ख हलकं होणार नाही. आम्हाला राजकारणाशी घेणं-देणं नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
राजधानी दिल्लीमध्ये प्रति केदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंगं आहेत, त्याची स्थळं निश्चित आहेत. तसेच केदारनाथचे आहे. त्याचे स्थान आधीच ठरले आहे, ते बदलू कसे शकते? केदारनाथमध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. त्याबद्दल कोणीच का बोलत नाही? चौकशी का होत नाही? असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्याकडे आले होते. त्यांनी प्रणाम केला. त्यांना आशीर्वाद दिला. आमचा नियम आहे. जो येईल त्याला आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. ते येतात तेव्हा आशीर्वाद देतो. त्याचे काही चुकले तरी आम्ही बोलतो, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.