ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाण्याचे प्रभारी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्यापर्यंत सर्व नेते हजर असताना आव्हाड कुठे, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत छेडले असता आव्हाड हे वेगळे नसल्याची सारवासारव तटकरे यांनी केली.साधारण वर्षभरापूर्वी बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांंनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, प्रदेशपातळीवरून संजय भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. मात्र, भोईरांना हे पद देण्यावरून आव्हाड समर्थकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आ. आव्हाड यांनी बोलूनही दाखवली होती. तरीही, त्यांचा विरोध डावलून भोईर यांना हे पद दिले होते. भोईरांनी विरोधी पक्ष नेतेपदासह अनेक पदे भूषवल्यानंतरही सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आव्हाड व तटकरे एकत्र पत्रकार परिषदेला हजर राहिले, तर उभयतांना भोईर यांच्याबाबत एकच भूमिका घेणे अशक्य होईल आणि पक्षात मतभेद असल्याचे चित्र जाईल, त्यामुळे आव्हाड अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना छेडले असता, महापालिका निवडणूक काळात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जाते. ते आपल्या कामात व्यस्त असतील, असे सांगत पक्षात स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद नसल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>भोईर सत्तापिपासूविरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्यासह त्यांचे वडील देवराम भोईर, उषा भोईर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल तटकरे म्हणाले की, काही लोक सत्तेसाठीच जन्माला आलेले असतात. सत्तापिपासू माणसे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करीत असतात. दोनचार माणसे इकडेतिकडे गेल्याने पक्षाचे अस्तित्व कमी होत नाही. संजय भोईरांना पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, आता काहीतरी घबाड मिळवण्यासाठी ते तिकडे गेले असले तरी त्यांचा तिथे भ्रमनिरास होईल. कारण, येथे राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. >निवडणूक आयोगाने दखल घ्यावीठाण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावण्यात आले होते. प्रशासनाने कायदा, नैतिकतेने कारवाई करणे गरजेचे असून निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. >नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडचा दिला दाखलाठाण्यानंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वत:चे मोरबे धरण विकत घेतले. पिंपरी-चिंचवड शहरही विकसित झाले आहे. मात्र, ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांची तहानदेखील भागवता आलेली नाही. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपण पाटबंधारेमंत्री असताना प्रयत्न केले होते. मात्र, ठामपातील सत्ताधाऱ्यांनी केवळ टेंडरभोवती फिरत राहण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे पाण्याची समस्या अशीच रेंगाळत राहिली, असाही आरोप त्यांनी केला. >त्यांचा संसार सुखाचा होवो : पारदर्शक कारभाराच्या अटीवरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ ठाणे आणि मुंबई महापालिकेतील कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे. योग्य वेळी या कामांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीची चर्चा अजूनही सुरूच आहे. त्यांचा संसार सुखाचा होवो, असा टोमणाही तटकरे यांनी लगावला.
तटकरेंच्या परिषदेला आव्हाडांची दांडी
By admin | Published: January 17, 2017 4:16 AM