शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरराव गेडाम यांचे बुधवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता गिरीपेठ येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना शासकीय सलामी दिली. यानंतर माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत विदर्भवादी भाऊ जांबुवंतराव धोटे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, माजी मंत्री रणजित देशमुख, विनोद गुडधे पाटील, अनिल देशमुख, आ. सुधाकरराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. माजी आमदार यादवराव देवगडे यांनी संचालन केले. या शोकसभेत आ. प्रकाश गजभिये, डॉ. गोविंद वर्मा, सलील देशमुख, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार अशोक धवड, मधुकर वासनिक, केशवराव शेंडे, पुंडलिक जवंजाळ, जयप्रकाश गुप्ता, राजकुमार तिरपुडे, वामनराव कोंबाडे, एस.क्यू. जमा, हुकूमचंद आमधरे, दिलीप देशमुख, विठ्ठलराव टालाटुले, डॉ. भाऊ लोखंडे, रमेश गिरडे, अशोक धोटे, राम घोडे, रामभाऊ महाजन, बंडू उमरकर, नरेश मेश्राम, शिवकुमार अग्रवाल, रतिलाल मिश्रा, अॅड. मा.म. गडकरी, अरुण वनकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरराव गेडाम यांचे चिरंजीव संजय गेडाम यांना आज सकाळी फोन करून आपली शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच महापौर प्रवीण दटके यांनी गिरीपेठ येथील निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. शासनातर्फे तहसीलदार अनिल गावित यांनी पुष्पचक्र अर्पण केले. स्वतंत्र विदर्भ हीच खरी श्रद्धांजलीज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरराव गेडाम हे राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. विदर्भाचे ते कट्टर समर्थक होते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा रेटून धरण्यात यावा, या शब्दात आपली शोकसंवेदना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.
शंकरराव गेडाम अनंतात विलीन
By admin | Published: November 07, 2014 12:41 AM