मुंबई : पतीच्या निधनानंतर चार मुलींचा सांभाळ करण्यासाठी गेल्या ३५ वर्षांपासून केशकर्तनाचा व्यवसाय करीत असलेल्या शांताबाई यादव यांना गॅस शेगडी आणि कायमस्वरूपी गॅस सिलिंडरही मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.गडहिंगल्ज तालुक्यातील हसूर येथील शांताबार्इंनी गरिबीशी दोन हात करीत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या केशकर्तनाचा व्यवसाय स्वीकारला. परिसरातील गावांमध्ये जाऊन त्या केशकर्तनाचे काम करतात. या बळावर त्यांनी चार मुलींचे विवाह केले. शांताबार्इंच्या या धाडसाची कहाणी सांगणारी चित्रफीत सध्या सोशल मीडियामध्ये फिरत आहे. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी ती पाहिली. या चित्रफितीत शांताबाई फुंकणीने चूल पेटवत असून, त्यांना धुराचा त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसते. हे बघून भारतीय यांनी शांताबार्इंच्या घरी भाजपाच्या तालुका पदाधिकाऱ्यांना पाठविले. आधी दोन दिवस त्या घरी नसल्याने भेट झाली नाही म्हणून पदाधिकारी तिसऱ्या दिवशी जाऊन त्यांना भेटले. तेव्हा, माझ्या घरी मुलीने दिलेली गॅस शेगडी आहे; पण सिलिंडरचा खर्च परवडत नसल्याने ती तशीच पडून असल्याची व्यथा शांताबार्इंनी सांगितली. लगेच सूत्रे हलली. शांताबार्इंचे आधारकार्ड, रेशनकार्डच्या प्रतिलिपी भारतीय यांनी मागवून घेतल्या. त्यांना सिलिंडर नियमितपणे पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली. श्रीकांत भारतीय हे या सिलिंडरचे पैसे आपल्या वैयक्तिक बँक खात्यातून नेहमीसाठी देणार आहेत. त्यामुळे चुलीच्या धुराचा शांताबार्इंचा त्रास आजन्म संपला आहे. (विशेष प्रतिनिधी)अन् सूत्रे हललीश्रीकांत भारतीय हे या सिलिंडरचे पैसे आपल्या वैयक्तिक बँक खात्यातून नेहमीसाठी देणार आहेत. त्यामुळे चुलीच्या धुराचा शांताबार्इंचा त्रास आजन्म संपला आहे. भारतीय यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
शांताबाई यादवना मिळाली गॅस शेगडी
By admin | Published: July 05, 2016 1:22 AM