बचावासाठी पवार सरसावले : वास्तवाचे भान ठेवून राष्ट्रवादी आमदारांचे मतदान
मुंबई : महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही. मतदानाच्या दिवशी वास्तवाचे भान ठेवून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
ज्या भाजपाला आपण जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले त्यांनाच मदत करणार का, भाजपा आजही आपल्यासाठी जातीयवादी पक्ष आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नात पवार म्हणाले की, सरकारला काही दिवस काम करू द्या. त्यांनी जातीयवादी भूमिका घेतली तर आर.आर. पाटील सभागृहात त्यांना जाब विचारतील. आताच्या परिस्थितीत प्रशासन आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुन्हा निवडणूक होणो परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही हे सरकार अस्थिर होऊ देणार नाही. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका राहीलच. भाजपाने आम्हाला पाठिंबा मागितलेला नव्हता. आम्ही पक्षात सामूहिकरीत्या विवेकी निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या काही माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये म्हणून आपण पाठिंबा देत आहात का, या प्रश्नात ते म्हणाले की, तसे काहीही नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी, अगदी खोलात जाऊन करावी, तो त्यांचा अधिकार आहे. आमची काहीही हरकत नाही. (विशेष प्रतिनिधी)
1‘आपण जे बोलता त्याच्या उलट करता असे आपल्याबाबत बोलले जाते. सरकारचा पाठिंबा पाच वर्षासाठी असेल का? या प्रश्नावर पत्रपरिषदेत एकच हशा पिकला. त्यावर हसत हसत दाद देत पवार यांनी, ‘सरकार पाच वर्षे टिकेल,’ असे मी कुठेही म्हटलेले नाही, असा गुगली टाकला.
2अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार उभे राहिले तर तुम्ही कोणाला मतदान करणार, या प्रश्नात ते म्हणाले की, उमेदवार बघून ठरवू. नाहीतर नोटाचा पर्याय आहे आमच्याकडे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार नसेल.
3सरकार चालविणो ही एक कला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना ती साधली होती. राममंदिरासारखे मुद्दे त्यांनी बाजूला ठेवले होते. तसे या राज्य सरकारने अडचणीचे मुद्दे बाजूला ठेवले तर सरकार नीट चालेल, असे पवार यांनी सूचित केले.