आंबेठाण : शेतकऱ्यांना न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन आणि चळवळीच्या माध्यमातून आयुष्यभर लढा देणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी खासदार शरद जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन आंबेठाण (ता. खेड) येथील अंगारमळा येथील त्यांच्या शेतामध्ये कुठलाही धार्मिक विधी न करता करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या कन्या श्रेया शहाणे, गौरी जोशी, नात शमा शहाणे, जावई सुनील शहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शरद जोशींचे शनिवारी सकाळी पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले होते. निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आयुष्यभर शेतकरी आणि समाजातील विविध चळवळींशी संबंध ठेवून त्यांनी पुरोगामी विचारधारा जोपासली होती. त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारानंतर अस्थींचे धार्मिक स्थळी विसर्जन न करता त्यांचा चाकणजवळील आंबेठाण येथील अंगारमळा येथील त्यांच्या शेतातील वडाच्या झाडाजवळ विसर्जित करण्यात आले. याप्रसंगी कोणताही धार्मिक विधी करण्यात आला नाही. (वार्ताहर)
शरद जोशी यांच्या अस्थींचे अंगारमळा येथे शेतात विसर्जन
By admin | Published: December 19, 2015 3:05 AM