कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याला ‘एसआयटी’च्या पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या पिस्तुलांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कळसकर याच्याकडे दिली होती. त्याची संशयित भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (रा. महाद्वार रोड, बेळगाव), फरार असलेला सागर लाखे यांच्यासोबत बेळगाव येथील बसस्थानकात बैठक झाली होती. पिस्तुलांचे तुकडे करून ते विविध ठिकाणी विस्कटून टाकून पुरावा नष्ट करण्याची जबाबदारी कळसकरवर सोपविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून पोलिसांनी गावठी बॉम्ब, डिटोनेटर, आठ पिस्तुले, आदी हत्यारे जप्त केली होती. या प्रकरणी मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने तीन वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत या तिघांना अटक केली होती. हे तिघे जरी वेगळ्या संघटनेत काम करीत असले, तरी ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या संशयावरून त्याला अटक केली. त्यानंतर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने बंगलोर एसआयटीने त्याला अटक केली. कळसकरचा गोविंद पानसरे हत्या प्रकरणात काही संबंध आहे का? याचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’चे पथक मुंबईला चौकशीसाठी गेले होते. त्याने पानसरे हत्येतील कटाची माहिती दिली; परंतु आपला सहभाग लपवून ठेवला. त्यामुळे पोलिसांनी २४ आॅगस्ट २०१८ रोजी या गुन्ह्यामध्ये त्याला साक्षीदार केले.
बंगलोर पोलिसांनी कोका (मोक्का) गुन्ह्यामध्ये कळसकरचा जबाब नोंदविला. त्यानंतर कोल्हापूर एसआयटीने त्याचा जबाब नोंदविला. या दोन्ही जबाबांमध्ये मोठी तफावत दिसून आली. तो तपासासंबंधी माहिती लपवीत असल्याची पोलिसांची खात्री झाली.कळसकरचा पानसरे हत्येमधील सहभागतपासामध्ये संशयित कळसकर हा पानसरे हत्येपूर्वी पाच ते सहा दिवस कोल्हापुरात मुक्कामाला होता. हत्येनंतर संशयित भारत कुरणे व सागर लाखे हे कोवाड मार्गे बेळगावला गेले. याठिकाणी बेळगाव बसस्थानकामध्ये त्यांची कळसकर व अमित डेगवेकर यांच्यासोबत बैठक झाली. हत्येसाठी वापरलेली पिस्तुले कळसकर याच्याकडे देण्यात आली. त्यांचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे दिली होती. ती हत्यारे पुढे कोणाला दिली, की त्यांची विल्हेवाट लावली हे कळसकरच्या चौकशीमध्ये स्पष्ट होणार आहे.
पानसरे हत्येमधला तो महत्त्वाचा दुवा असल्याची खात्री झाल्यानंतर कोल्हापूर एसआयटीने मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सहकार्याने मुंबई सत्र न्यायालयाच्या मंजुरीने त्याचा सोमवारी (दि. १०) ताबा घेतला. तेथून त्याला सशस्त्र बंदोबस्तात कोल्हापुरात आणले. त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवले. पहाटे तीनच्या सुमारास अटक दाखवून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा न्यायालयात हजर केले.
तपास अधिकारी तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, तानाजी सावंत यांच्यासह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा न्यायालय परिसरात तैनात केला होता. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी कळसकरचा पानसरे हत्येमध्ये कशा प्रकारे सहभाग आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर संशयिताचे वकील संजय धर्माधिकारी यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राऊळ यांनी संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.कोल्हापुरात वास्तव्यकळसकर याचे चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात वास्तव्य होते. तो येथील एका औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात लेथ मशीनवर काम करीत होता. यावेळी त्याच्या मित्रांची कोल्हापुरातील खोलीवर ऊठबस असायची. पथकाने वाय. पी. पोवारनगर, उद्यमनगर, गोकुळ शिरगाव, शिरोली एम. आय. डी. सी. परिसरात कळसकर ज्या ठिकाणी काम करीत होता. तो वास्तव्यास होता, तेथील माहिती पथकाने घेतली आहे.आतापर्यंत यांना झाली अटकसमीर विष्णू गायकवाड (३२, रा. मोती चौक, सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. दैवद संकुल, पनवेल, नवी मुंबई), अमोल अरविंद काळे (३४, रा. पिंपरी चिंचवड, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. करकी, मुक्ताईनगर, जळगाव, सध्या रा. साखळी, ता. यावल), भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वाररोड, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), शरद कळसकर.