Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनी केलेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच पक्ष संघटना वाचवण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला असून, सुपुत्र आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, काही भागातून शिवसेनेला अद्यापही मोठा पाठिंबा मिळत असून, पक्षातील इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच दोन मोठे नेते शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आता राज्यभरात स्ट्राँग नेटवर्क असलेला एक युवानेता शिवसेनेत प्रवेश करणार असून, उद्धव ठाकरे त्यांच्या हाताला शिवबंधन बांधणार आहेत.
काहीच दिवसांपूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव सुषमा अंधारे तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले होते. आता यानंतर युवा नेता 'धाडस'चे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोळी यांच्या हाती शिवबंधन बांधतील. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
शिवसेना पक्ष अडचणीत सापडला आहे. अनेक जणांना अनेक पदे देऊन सेनेच्या बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण आता अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच जिथे कमी तिथे आम्ही... माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे मोठे काम उभे करेन. असा विश्वास उद्धव ठाकरे यांना दिला आहे, अशी प्रतिक्रिया शरद कोळी यांनी दिली.
शरद कोळी यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद
शरद कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक असले तरी त्यांच्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या नावे दमदाटी, धमकावणे, खंडणी, तडीपार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दुसरीकडे काँग्रेसचे तत्कालीन ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांच्यासोबतही कोळी यांचा ओबीसी आंदोलनात सहभाग होता.
दरम्यान, शरद कोळी यांचे 'धाडस' संघटनेच्या माध्यमातून मोठे नेटवर्क आहे. संघटनेच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. 'धाडस'च्या ५ हजार पेक्षा जास्त शाखा असल्याचा त्यांचा दावा आहे. ५ हजार शाखा पदाधिकाऱ्यांसहित ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.