Sharad Pawar News: निवडणूक आली, ती येत असते ५ वर्षांनी. पण या वेळेची निवडणूक पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे. देशाचा विचार आम्ही ज्या वेळेला करतो, त्यावेळेला १० वर्ष ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी काय भूमिका घेतली? सांगितले काय? आणि काय केले? याचा हिशोब मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे. ही ती वेळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. नगर जिल्ह्याचे काम वेगळे चालते. इथे काही मंडळी आहेत, अनेक वर्षांपासून सांगतात ५० वर्ष सेवा करत आहे. पण जे मला ऐकायला मिळते, काय असे महत्त्वाचे काम त्यांनी केले? मी अभिमानाने सांगतो की, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अण्णासाहेब शिंदे, धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांनी काढला. आनंद आणि अभिमान आहे, मला त्या गोष्टीचा. पण नंतरच्या पिढीने काय दिवे लावले? आज ते सांगताहेत, अनेक गोष्टी, पण त्यांचे एकंदर वागणे कसे? दुसरी पिढी, तिसरी पिढी आली, अशी टीका शरद पवार यांनी केली.
सत्ता इतकी डोक्यात गेलेली आहे की...
अनेक लोक मला सांगतात. सत्ता इतकी डोक्यात गेलेली आहे की, या लोकांमध्ये वडीलधाऱ्या माणसाला इज्जतीने वागवण्याचा स्वभाव नाही. टीकाटिप्पणी करायची, कोणावरही करायची, अनेक गोष्टी करायच्या, त्या गोष्टी अशा करायच्या की, त्याचा कुठलाही फायदा त्याला घेता येईल त्या पद्धतीने करायच्या, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला. सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. ED च्या केसेस करतात, CBIच्या केसेस करतात, करप्शनच्या केसेस करतात, खोट्या केसेस करतात, अनेकांवर केसेस केल्या, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राज्य सहकारी बँकेमध्ये काही झाले, त्याच्यात माझ्यावर केस केली. राज्य सहकारी बँकेचा सभासद नाही, राज्य सहकारी बँकेतून कर्ज कधी आयुष्यात काढले नाही. त्या बँकेत कधी गेलो नाही, तरीही माझ्यावर केस केली. नोटीस आली की, या ED च्या ऑफिसमध्ये. मी येतो म्हटले, निघालो यायला. सर्व अधिकारी आले, हात जोडले, येऊ नका येऊ नका, आमच्याकडून चुकून नोटीस आली. मी बोललो, आता आल्याशिवाय राहत नाही, शेवटी ती नोटीस थांबली त्या ठिकाणी. पण मोदी यांनी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जो वागतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी या ED चा गैरफायदा हा ठीक ठिकाणी घ्यायला सुरुवात केली, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.