शरद पवार-अजित पवारांची गुप्त बैठक; पृथ्वीराज चव्हाणांना वेगळीच शंका, म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 11:22 AM2023-08-13T11:22:19+5:302023-08-13T11:23:04+5:30
शरद पवारांनी भाष्य केल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य राहणार नाही. ही गोष्ट फारकाळ लपून ठेवता येणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाली. उद्योपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील घरी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकोपा राहावा यादृष्टीने ही बैठक झाल्याचे बोलले जाते. जवळपास ४ तास दोन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. राष्ट्रवादीतील या घडामोडींवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संशय व्यक्त केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अतुल चोरडियांच्या घरी ही बैठक झाली अशी बातमी ऐकली परंतु त्यांनी नकार दिला. मात्र माध्यमांकडे याचे फुटेज उपलब्ध आहेत. त्यामुळे ही भेट झाली की नाही हे सांगता येत नाही. शरद पवार-अजित पवार यांच्या दोघांपैकी कुणीतरी महाराष्ट्राला खरे सांगितले पाहिजे. एकाबाजूला काही जणांनी १० तारखेपर्यंत मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला. तो पूर्ण झाला नाही तर पुढे काय? मात्र या भेटीबाबत शरद पवारांनी बोलायला हवं असं त्यांनी म्हटलं.
तसेच शरद पवारांनी भाष्य केल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य राहणार नाही. ही गोष्ट फारकाळ लपून ठेवता येणार नाही. या दोन्ही नेत्यांची भेट संशयास्पद आहे. मित्रपक्षांना, कार्यकर्त्यांना या भेटीबाबत सांगितले पाहिजे. एकेकाळी राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या पक्षातील नेत्यांची ही बैठक आहे. त्यामुळे ही घरगुती बाब नाही. जे काही असेल खरे सांगावे. अधिकृत माहिती समोर आणावी. कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर केला पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
काका-पुतण्यांच्या बैठकीत काय घडलं?
शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे. आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत पुण्याचे सुप्रसिद्ध बिल्डर अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक घेतली. आपण येणार नसाल तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांना तरी पाठवा, अशी गळ अजित पवार यांनी यावेळी घातली असल्याची माहिती आहे.