जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:33 AM2023-07-13T09:33:24+5:302023-07-13T09:34:47+5:30

ज्यांनी आंदोलन छेडले त्यातील काहीजण आता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा विचार करीत आहेत.

Sharad Pawar-Ajit Pawar dispute, Clashes in NCP Party activists | जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

googlenewsNext

शिवसेनेच्या फुटीनंतर जे चित्र होते तेच आज राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वेगवेगळ्या शहरांत अनुभवायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार गट उदयास आले असताना कल्याण-डोंबिवलीतही काही प्रमाणात का होईना शरद पवार किंवा अजित पवार गट दिसायला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील राष्ट्रवादीचा एक मोठा गट अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे; पण अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली होती त्यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनावर टीका झाली. ज्यांनी आंदोलन छेडले त्यातील काहीजण आता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन छेडणारे कोणत्या तोंडाने आता अजित पवारांसोबत जातील, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे.

श्रीनिवास यांची पुन्हा शिष्टाई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या निमित्ताने पवार कुटुंबातही फूट पडल्याचे चित्र उभे राहिल्याने आता कुटुंबातूनच ही दूरी सांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मागीलवेळी जेव्हा अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा ते आपले भाऊ श्रीनिवास यांच्याकडे मुक्कामाला होते. त्याच श्रीनिवास यांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा गेल्याने कुटुंबातील कलह मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता ही श्रीनिवास शिष्टाई किती यशस्वी होते, ते अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच्या प्रतिसादानंतरच कळेल.

काँग्रेसचे धोरण पवारपूरक
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने राज्यात काँग्रेसच्या वाढीला आता पूरक वातावरण आहे. काँग्रेस वाढवायची, पण पवारांना न दुखावता... असा फॉर्म्युला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या दिल्लीच्या बैठकीत ठरल्याचे सांगितले जाते. भाजपसोबत न जाता पवारांनी एकप्रकारे आपली काँग्रेस विचारांशी बांधिलकी दाखवून दिल्याचे मानणारा मोठा गट काँग्रेसमध्ये आहे. शिवाय पवारांची ज्या पद्धतीने कोंडी झाली त्याबद्दल जशी भाषा वापरण्यात आली आणि भाजपने दिल्लीपासून गल्लीपर्यंत यंत्रणा राबवली, ते पाहता पवारांबद्दल साहनुभूती असल्याने पवारांना पूरक धोरण राबवत काँग्रेस वाढवली जाईल, अशी चर्चा आहे. 

Web Title: Sharad Pawar-Ajit Pawar dispute, Clashes in NCP Party activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.