राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे मीडियाद्वारे समोर आले. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. दरम्यान, या भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे मात्र नक्की आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली की बैठक झाली हे मीडियामधून समजते आहे. यामधून एक जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. परंतू मागच्या काळात शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भाजपबरोबर कधी जाणार नाही. ही भूमिका मला वाटतं समोर आली आहे. पण, अजित पवार आणि शरद पवार यांच्या अशा भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे मात्र नक्की आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
याचबरोबर, हा संभ्रम दूर करण्यासाठी नक्की चर्चा होईल आणि मला पण वाटते की हा संभ्रम नक्की दूर व्हावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवार पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी मीडियाने दिली आहे.
शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीची बातमी मीडियाला कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवार बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. दरम्यान, भाजपसोबत मी जाणार नाही अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. मात्र अजित पवार-शरद पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवारांची ही स्वाभिमान सभा असल्याचे म्हटले आहे.