मुंबई – अजित पवार आणि इतर नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या या निर्णयानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले. परंतु गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीनं महाविकास आघाडीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवारांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी राजकारणात कधीही काही घडू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाने शरद पवारांशिवाय २०२४ ची निवडणूक लढवण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार-अजित पवार भेटीवर या दोन्ही पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीवर लवकरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहेत. रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर नाना पटोलेंनी राहुल गांधींशीही चर्चा केली आहे. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडीची मजबूत ताकद ठेवावी लागेल. एकजुटीने काम करावे लागेल. २०२४ च्या निवडणुकीसाठी रणनीती तयार ठेवावी लागेल अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे.
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला शरद पवार सोबत हवेत. महाविकास आघाडी अबाधित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. परंतु काका-पुतण्याच्या वारंवार भेटीमुळे विरोधकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचतो त्याचसोबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शरद पवार यांच्याशिवाय लोकसभा निवडणुकीत उतरण्याची काँग्रेस-ठाकरे गटाची रणनीती तयारी ठेवावी लागेल असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईतून त्यांच्या पक्षाची वाटचाल ठरवू शकतात परंतु काँग्रेसला दिल्लीच्या परवानगीशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत काँग्रेसच्या राज्य नेत्यांनी दिल्लीला कळवले आहे. दिल्ली हायकमांडही या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. मात्र रणनीती तयार ठेवणे म्हणजे आघाडी तोडणे नव्हे पण आम्हाला कुठल्याही प्रसंगासाठी तयार रहायचे आहे असंही संबंधित नेत्याने सांगितले.