भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 02:05 PM2023-11-15T14:05:17+5:302023-11-15T14:10:02+5:30
भाऊबीज साजरी करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची आई प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता स्वत: शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहचले आहेत
पुणे – दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दिवाळी सण आहे. त्यामुळे शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का अशी चर्चा होती. परंतु दिवाळीला सर्व मतभेद विसरून कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार-अजित पवार एकत्र आलेत. पाडव्याला गोविंदबागेत शरद पवारांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आले होते. परंतु अजित पवारांच्या अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. परंतु रात्री उशीरा अजितदादा शरद पवारांच्या घरी गेले होते. आता भाऊबीजेला पवार कुटुंब अजित पवारांच्या निवासस्थानी जमले आहेत.
भाऊबीज साजरी करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची आई प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता स्वत: शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी दिवाळीनिमित्त कौटुंबिक आनंद साजरा करण्यासाठी एकत्र येण्याची पवार कुटुंबाची परंपरा कायम राहिली आहे. पाडव्याला अजित पवारांनी सहकुटुंब गोविंदबागेत शरद पवारांसोबत स्नेहभोजन केले. त्यानंतर आता भाऊबीज अजितदादांच्या घरी साजरी केली जात आहे.
अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आज भाऊबीज साजरी केली जातेय. तिथे शरद पवारांनी सहकुटुंब हजेरी लावली आहे. शरद पवारांसोबत माजी मंत्री राजेश टोपे हेदेखील उपस्थित आहेत. सकाळी सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार या अजितदादांच्या घरी पोहचल्या होत्या. तेव्हा शरद पवार अजितदादांच्या घरी येणार का असा प्रश्न विचारला जात होता. शरद पवार हे बारामतीत शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यास गेले होते. मात्र तिथून आता शरद पवार अजित पवारांच्या घरी आले आहेत.
जूनमध्ये अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेत भाजपा-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ९ इतर नेतेही त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेला. त्याठिकाणी अजित पवार गटाने बोगस कागदपत्रे दाखल केल्याचा दावा शरद पवार गटाने केला. निवडणूक आयोगात हे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. त्यातच दिवाळीला अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.