काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:15 PM2024-05-10T13:15:15+5:302024-05-10T13:24:46+5:30
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबत यावं असं विधान केलं आहे.
Narendra Modi : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत येण्याची ऑफर दिली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा आमच्यासोबत या अशी खुली ऑफर मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. याआधी देखील एका मुलाखतीमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर मदतीसाठी जाणारी पहिली व्यक्ती मी असेन असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सोबत येण्याची ऑफर दिल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोदींची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
"महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केलं आहे जे मला वाटतं त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केलं असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटतंय ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं. याचा अर्थ असा की जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील," असं नरेंद्र मोदी म्हणाले.