मुंबई- भीमा-कोरेगाव इथे गेल्या 200 वर्षापासून लोक येतात. पण आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहजिकच तिथे उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. अशावेळी तिथे योग्य ती काळजी घेण्याची गरज होती. आता या घटनेला कोणताच रंग देऊ नये. प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना शांतता बाळगण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
या घटनेविषयी मी वढू गावातील लोकांशी संवाद साधला. पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येथे येऊन चिथावणी दिल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. बाहेरून आलेले लोक गोंधळ करून गेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीएक संबंध नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितलं.
गावात गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होती. यावेळी २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे लोकांना येथे येण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे गर्दी जास्त होणार याची सर्वांनाच कल्पना होती. दोन दिवसांपासून येथील वातावरणातही अस्वस्थता होती. त्यामुळे योग्य ती दक्षता घेण्याची गरज होती. ती न घेतल्यानेच ही परिस्थिती उद्धवल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
कालच्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील एका तरूणाचा मृत्यू झाला. ही गोष्ट चिघळू नये याची पोलिसांनी योग्य काळजी घेतली, हे चांगले झालं. पोलिसांनी या घटनेच्या तळापर्यंत जंवे. राज्य सरकारनेही याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली व पुन्हा एकदा सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं.
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्या आहेत.वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
मोठा अनर्थ टळलाविजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी वळविली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक न्हावरा फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे, शिक्रापूरमार्गे चाकणकडे, कोरेगाव भीमा येथून चौफुल्याकडे वळविण्यात आली. पुण्याकडून येणारी वाहतूक खराडीमार्गे सोलापूर रोडने न्हावरामार्गे नगरकडे, विश्रांतवाडीमार्गे चाकणकडे वळविली होती. तरीही पुणे नगर रस्त्यावर कोंडी झाली.