एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:13 PM2023-08-29T18:13:06+5:302023-08-29T18:15:58+5:30

मी पक्षाच्या संघटन वाढीसाठी, तसेच राज्यातील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी करीन अशी ग्वाही रोहिणी खडसेंनी दिली.

Sharad Pawar Appointed to Rohini Khadse as NCP women state president | एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी

एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी

googlenewsNext

मुंबई – अजित पवारांसह ९ नेत्यांनी शरद पवारांपासून फारकत घेत थेट राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीत २ गट पडलेत. त्यात बरेच पदाधिकारी अजित पवारांच्या बाजूने गेल्याने शरद पवार गटाने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या हकालपट्टीची पत्रे काढली. आता शरद पवारांसोबत राहिलेल्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

त्यात शरद पवारांनी आमदार एकनाथ खडसे यांची लेक रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर विश्वास टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसेंची नियुक्ती केली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रोहिणी खडसे यांच्यावर दिली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र शरद पवारांनी रोहिणी खडसेंना दिले आहे.

याबाबत रोहिणी खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब, पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खा. डॉ. फौजिया खान यांचे आभार व्यक्त करते. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीला जी संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी काम करीन. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आ. डॉ. जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनात या संधीचा उपयोग मी पक्षाच्या संघटन वाढीसाठी, तसेच राज्यातील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी करीन अशी ग्वाही त्यांनी दिली.

रोहिणी खडसेंची ओळख

रोहिणी खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. शिक्षण क्षेत्रात एलएलबी, एलएलएमपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलंय. २०१९ मध्ये एकनाथ खडसे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंच्या कन्येला तिकीट देण्यात आले. रोहिणी खडसेंनी विधानसभा निवडणूक लढवली पण अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर एकनाथ खडसेंसोबत रोहिणी खडसेंनीही राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधले.

Web Title: Sharad Pawar Appointed to Rohini Khadse as NCP women state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.