मुंबई : आगामी निवडणुकीत आपण कोणत्या पक्षासोबत जाणार? काँग्रेसच्या सोबत लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार? असा थेट सवाल राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या कन्या आणि खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत केला. मात्र या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे टाळत पवारांनी समविचारी पक्षांसोबत, एवढेच उत्तर दिले. त्यामुळे पक्षाची पुढील दिशा कळण्याच्या आशेने आलेल्यांचा संभ्रम कायम आहे.मात्र त्याच बैठकीत, राज्यातल्या भाजपा सरकारच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. लोक सरकारच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे तेथे केंद्राच्या निवडणुकांसोबत राज्यांच्याही निवडणुका होऊ शकतात, तेव्हा तयारीला लागा, असे पवार म्हणाल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. आम्ही आक्रमकपणे बोलू, विषय मांडू पण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, आपण नेमके कोणासोबत आहोत याविषयी आपल्या वरिष्ठ नेत्यांमध्येच संभ्रम राहीला तर खाली लढताना त्रास होतो, त्यामुळे आपली भूमिका काय? असा थेट सवाल खा. सुळे यांनी केला होता, पण पवार यांनी सतत नेत्यांमध्ये संवाद राहिला की संभ्रम राहण्याचा प्रश्न येत नाही, असे म्हणून स्पष्ट उत्तर दिले नसल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.शरद पवार नेमके कोणासोबत? या प्रश्नावरुन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी कायम राष्टÑवादीवर टीका केली. राष्ट्रवादीचे नेतेही ‘साहेबांच्या मनातले कळत नाही’, असे म्हणतात. त्या सगळ्यांच्या प्रश्नाला खा. सुळे यांनी वाट करुन दिली पण त्यांच्याही हाती काहीच लागले नाही. बैठकीनंतर अनेक नेते त्याचीच चर्चा करत होते.पक्षाचे नेते अजित पवार यांनी मात्र रोखठोक भूमिका घेत, पक्ष तुम्हाला कार्यक्रम देईल आणि मग तुम्ही लढाल, याची वाट पहात बसू नका. लोकांनी प्रश्न विचारण्याच्या आत तुम्हीच आक्रमकपणे लोकांमध्ये जा. या सरकारने केलेल्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत न्या. आपल्याला भाजपाच्या विरोधात लढायचे आहे, असे सांगून विजनिर्मितीच्या बाबतीत राज्य सरकारने केलेल्या घोटाळ्यांची माहितीही त्यांनी दिली. राज्यात वीज तयार होत नाही, कोळसा नाही, अनेक वीजनिर्मिती केंद्रे बंद आहेत, हे लोकांपर्यंत न्या, असे त्यांनी सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात विधानसभेत सुरतच्या १२ जागांपैकी एकही जागा भाजपा जिंकू शकणार नाही, असे वातावरण असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, असे सांगितले आहे. औरंगाबादेत ५ नोव्हेंबरला होणाºया बैठकीत पक्षाची दिशा स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले शरद पवारांनी
By अतुल कुलकर्णी | Published: October 04, 2017 5:26 AM