मुंबई: काल मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी(Raj Thackeray) शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तसेच, बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावरुनही राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्या टीकेला आज शरद पवारांनी(Sharad Pawar) प्रत्युत्तर दिले. "बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास दाखवला, त्याचा मी यापूर्वीही विरोध केला आणि आजही करतो," असे पवार म्हणाले.
"मी मागे एकदा पुरंदरेबद्दल बोललो होतो. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं, हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी घडवल्याचं म्हटलं होतं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजा मातेनेच घडवंल आहे. महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान जिजामातेचे आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधीही होता आणि आताही आहे."
'जेम्स लेनला माहिती पुरवली'"दुसरी गोष्ट म्हणजे, जेम्स लेनेने त्याच्या पुस्तकात जे लिखाण केलं होतं, ते त्याने पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे लिहील्याचं म्हटलं होतं. अतिशय घाणेरडं लिखाणं एखाद्या लेखकाने केले आणि त्याला माहिती पुरवण्याचे काम पुरंदरनी केले. त्यावर पुरंदरने कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मला त्याचा अभिमान आहे," असंही पवार म्हणाले.
'शाहु-फुले-आंबेडकरांचा अभिमान'पवार पुढे म्हणाले की, "राज ठाकरे म्हणातात की, मी माझ्या भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतो. पण, मला त्यांचा अभिमान आहे. या राज्यात शिवछत्रपतींचे सविस्तर वृत्त काव्यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वात आधी लिहीले. शाहू,फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आस्था होती. महाराजांचा आदर्श घेऊन सत्तेचा वापर कसा करावा, याचा विचार तिन्ही पक्षांनी केला आणि त्यातूनच महाराजांच्या विचाराची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं पवार म्हणाले.
संबंधित बातमी- "राज ठाकरेंना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही"; शरद पवारांचे प्रत्युत्तर