नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 05:45 PM2023-07-05T17:45:30+5:302023-07-05T17:47:12+5:30
नागालँडमध्ये भाजपा चालतो, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे, असा अजित पवारांनी केला होता सवाल
Ajit Pawar vs Sharad Pawar: महाराष्ट्रात रविवारी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. या दोन गटांच्या आज बैठका होत्या. या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. अजित पवारांसोबत कोण आणि शरद पवारांसोबत कोण, असा सवाल संपूर्ण राज्यातील जनतेला पडला होता. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत अजित पवारांना बहुसंख्य आमदारांचे समर्थन असल्याचे दिसून आले. तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत मोजकेच आमदार उपस्थित राहिले. त्यानंतर आज अजित पवारांनी पक्षातील अंतर्गत गोष्टींबाबत रोखठोक मत मांडले. यावर प्रत्युत्तराचे भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमधील भाजपाला साथ देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच त्या निर्णयामागचे कारणही समजावून सांगितले.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार तयार झाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही भाजपासोबत गेलो त्यात काय चुकलं? असं या साऱ्यांचे म्हणणं आहे. मीच तेथील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना भाजपाला पाठिंबा देण्यास परवानगी दिली हे खरं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नागालँड किंवा मणिपूर सारखी राज्य ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहेत. तो संबंध भाग शेजारील देशांना चिकटून आहे. चीन आणि पाकिस्तान या देशांना चिकटून असलेली भारतातील जी राज्य आहेत, त्यांच्यासंबंधी बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी या राज्यातील असंतोषाचा बाहेरील देश गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य असणे महत्त्वाचे असते, म्हणून तेथे पाठिंबा देण्यात आला", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असेही शरद पवार म्हणाले.
शिवसेना आणि भाजपात फरक आहे. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होते. बाळासाहेबांनी तेव्हा पत्रक काढले, इंदिरा गांधी संकटात आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेने एकही उमेदवार दिला नाही. काँग्रेसने विधानपरिषदेत शिवसेनेच्या लोकांना जागा दिली. भाजपाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेशवादी, मनुवादी आणि विघातक आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदुत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे, असा दोन पक्षांतील हिंदुत्वाचा फरक पवारांनी सांगितला.