Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, दुसरीकडे दावे-प्रतिदावे, ऑफर सुरू झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनशरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यास अनेक जण इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता अजित पवार यांच्या घरवापसीबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यानंतर आता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांनी राज्यभरात दौरे करण्याची योजना आखली असून, बारामतीत जाहीर सभा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे म्हटले जात आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या गटातील इन्कमिंगबाबत भाष्य करताना अजित पवार यांच्याबाबत सूचक विधान केल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंब वेगळे होत नाही
अजितदादांसाठी घरात जागा आहे का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, घरात सर्वांनाच जागा आहे. अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब कधी वेगळे होत नाही. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्वाचे आहे. तरीही ही जर तरची गोष्ट आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर दिली आहे. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असे म्हणत आहे. वंचितकडे जातो असे सांगत आहेत. आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावे. त्यांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.