अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:26 PM2023-12-13T14:26:58+5:302023-12-13T14:32:30+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आपला रोष व्यक्त केला आहे.
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत महायुती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरही दावा सांगितला असून पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या गटाला मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसंच दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेतेही एकमेकांसमोर उभ ठाकत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, "अजित पवारांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी त्यांनीच १९ ते २० आमदारांच्या सह्या घेतल्या आणि ते पत्र शरद पवारांना देण्यात आलं होतं. मात्र यात माझी सही नव्हती. कारण मला विरोधी पक्षनेते करा, यासाठी मीच पवारांना एक कॉन्फेडेन्शियल पत्र लिहिलं होतं. अजित पवारांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर नेहमीच सर्व पदे अजित पवारांना दिली गेली किंवा त्यांच्या मान्यतेने दुसऱ्यांना दिली गेली. शरद पवारांची सर्वांत मोठी चूक हीच आहे. जे करायचं ते अजितने करायचं, उपमुख्यमंत्री अजित पवारच, दुसरं कोणतं महत्त्वाचं पद असेल तरीही अजित पवार आणि पक्षात हे सगळ्यांना माहीत होतं. पण कोणी बोलत नाही आणि मी बोलतो, एवढाच फरक आहे."
"अजित पवारांना स्वत:शिवाय दुसरं कोणी नको होतं"
"विरोधी पक्षनेतेपदासाठी मी शरद पवारांना पत्र लिहिलं, पण ते मला मिळणारच नव्हतं. कारण मोठ्या पदांसाठी तिथं केवळ नऊ जणच हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी वर आलीच नसती. नवी पिढी आली पाहिजे की नाही? शरद पवारांनंतर तुम्हाला उचललं गेलं ना? पण तुम्ही तुमच्यानंतर कोणाला वर आणलं का? मी...मी आणि फक्त मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती," असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
"२०१९ ला राज्यपालांना जे पत्र दिलं गेलं, ते क्लार्कने अजित पवारांना दिलं होतं"
राष्ट्रवादीत यंदा घडलेलं बंड हे काही पहिलंच नाही. यापूर्वी २०१९ ला देखील अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध डावलून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गर्जे नावाच्या क्लार्कने अजित पवारांना दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच ते पत्र घेऊन अजित पवार राज्यपालांकडे गेले, मात्र नंतर ४० आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले, असंही आव्हाड म्हणाले.