Sharad Pawar Brijbhushan Singh Viral Photos: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्यांनी तो दौरा स्थगित केला. तसेच, भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा थेट आरोप राज यांनी पुण्याच्या सभेत केला होता. त्यानंतर मनसेकडून त्या दोघांना एकत्र फोटोही पोस्ट करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिले.
शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्याबद्दल...
"शरद पवार हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. खासदार बृजभूषण सिंह हेदेखील सदस्य आहेत. त्यामुळे मनसेने जो फोटो ट्वीट केला आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये" असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. उत्तर भारतीयांबाबत राज यांनी आधी जी विधाने केली होती, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येचा दौरा करावा, अशी मागणी बृजभूषण यांनी केली होती.
ओबीसी आरक्षण अन् निवडणुकांबाबत...
ओबीसी आरक्षणाविना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाही, याकरता राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे. याच दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ओबीसींना आरक्षण लागू झालेले असेल, तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मोठे विधान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. ओबीसी आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल. तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे, अशी स्पष्ट भूमिकाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
राज्यसभेच्या उमेदवारीबाबत...
"राज्यसभा उमेदवारांबाबतच्या सगळ्या प्रक्रियेत मी नाही. त्यामुळे मी याबाबत काही बोलू शकत नाही. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बोलतील", असे म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.
औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर...
"औरंगजेब व समाधी हा विषय काढून अस्वस्थता वाढवली जात आहे. मशिदीचा वाद निर्माण करुन वातावरण अस्थिर करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. काहीजण नवनवीन क्लृप्त्या काढून वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु कोण कृती करत असेल तर पोलीस नक्की कारवाई करतील", असे वळसे पाटील म्हणाले.
"नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रकार सुरू"
"पहिल्यापासून आम्ही सांगत आहोत की नवाब मलिक यांना गुंतवण्याचा प्रकार होत आहे. नवाब मलिक यांनी बरीच वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. नवाब मलिक हे निर्दोष आहेत", असे गृहमंत्र्यांनी सांगितलं.