राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये जामीन अर्जावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे. आव्हाड यांना अटक होणार की जामीन मिळणार, याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. असे असताना आव्हाड प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचे समोर येत आहे.
शरद पवार यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला होता. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यामध्ये पवारांनी शिंदे यांच्यासोबत आव्हाड प्रकरणी चर्चा केल्याचे समजते.
कोणत्याही राजकीय हेतून अशा कारवाया करू नका, हे उचीत नाहीय. यातून समाजात वेगळा संदेश जातो. अशा कारवाया टाळा, असे आवाहन पवार यांनी शिंदे यांना केले. यावर शिंदे यांनी देखील सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिले. कारवाई राजकीय हेतूने करण्यात आलेली नाही. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही नियमित प्रक्रिया आहे, त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे, असे शिंदे यांनी पवारांना सांगितल्याचे समजते.
आव्हाड यांच्यावरील गुन्ह्यात जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. दुपारी दोन वाजता निकाल येणार आहे. यावेळी जर तक्रारदार महिला ओळखीची होती, तर आव्हाड यांनी त्या महिलेला हात लावायला नको होता. ते तोंडाने बाजूला हो असे सांगू शकत होते. या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत, यामुळे आम्हाला पुढे तपास करायचा आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी करत आव्हाड यांच्या जामिनाला विरोध केला.